Saturday, August 8, 2015

धोकादायक

कृष्णा निवास इमारत कोसळली. १२ जण मरण पावले.

मिडिया: मिडिया ला २ दिवसांचे content मिळाले. ब्रेकिंग न्यूज, विश्लेषण, चर्चा, परिसंवाद आणि "पीडितां"च्या मुलाखती…. भरपूर कार्यक्रम…. भडक मथळे झळकले, संतापून सवाल विचारले गेले, "तुम्हाला बघवणार नाही, बघू नका" असे सांगत न बघवणारी दृश्ये खुशाल दाखवली गेली… TRP वाढला. 

महानगरपालिका: झोपलेले अधिकारी दचकून जागे झाले…. रात्रभर राबले… मिटींगा झाल्या… आदेश निघाले…जुने नियम नव्याने घोकले गेले…जुन्याच अधिकाऱ्यांच्या नव्या टीम्स बनवून शहरात चारही दिशांना पिटाळल्या  गेल्या… जुन्याच नोटीसा नव्याने बजावण्यासाठी. 

सरकार: महानगरपालिकेकडे वैतागून विचारणा झाली. कमिशनरवर प्रश्नांची सरबत्ती झाली. शहराच्या नगररचनेचा पुन्हा एकदा अभ्यास करण्याचा निर्धार झाला. 

विरोधी पक्ष: सरकारला पोटभर दोष देवून झाला. प्रश्नाला मालक विरुद्ध भाडेकरू असा रंग उगाचच दिला गेला. इतक्या गंभीर प्रसंगी सुद्धा Vote Bank ला भुलवण्याचा प्रयन्त झाला. 

सामान्य नागरिक: आश्चर्य, भय, दुःख, कणव, हताशपण आणि आपली Insurance Policy तपासून बघण्याचा पुनर्निर्धार अशा भावना अनुक्रमाने येउन गेल्या. 

प्रकरण संपल्यात जमा झाले. 

या सगळ्या कल्लोळात हे पूर्णपणे ignore केले गेले की या इमारतीतील रहिवाश्यांना तब्बल १० वर्षांपूर्वीच "इमारतीतून बाहेर पडा, यापुढे इथे राहू नका" अशा नोटीसा दिल्या गेल्या होत्या.  

इमारत धोकादायक होती हे तर खरेच. पण त्याहीपेक्षा धोकादायक हे आहे की कायद्याने आपली भूमिका बजावली नाही. कोणीतरी सतत १० वर्षे कायदा मोडत राहिले आणि कायद्याचे रक्षक (!) शांतपणे बघत बसले (wrong side ने २-wheeler वाले गाडी नेत असताना सुद्धा ट्राफिक पोलिस शांतपणे बघतात तसेच). 

रहिवाशांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न का झाला नाही? पोलिसांनी काय केले? महापालिकेने रहिवाशांना एका अती धोकादायक इमारतीत सुखाने १० वर्षे का राहू दिले? त्यांचे पाण्याचे कनेक्शन खंडित का केले नाही? विजेचे कनेक्शन महावितरण ने खंडित का केले नाही? मीटर रीडर १० वर्षे ह्या अती धोकादायक इमारतीच्या आतमधे जाऊन शांतपणे रीडिंग घेत राहिले??? गेल्या २ वर्षात महापालिका, राज्य आणि केंद्र अशा सर्व स्तरावरच्या निवडणुका होऊन गेल्या. सरकारी कर्मचारी (याद्या तपासण्यासाठी) आणि राजकारणी लोक (मते आजमावण्यासाठी) घरोघरी जाऊन आले. तसेच ते ह्या घरांमध्येही जाऊन, भेटून, बोलून आले असतील. कोणालाच काही करावेसे वाटले नाही???

त्या इमारतीपेक्षाही अती धोकादायक जर काही असेल तर ते हे की कायद्याचे पालन करण्याची तत्परता कोणीच दाखवली नाही. आणि ह्याही पेक्षा धोकादायक काही असेल तर ते हे की "जागल्या ची भूमिका बजावणारे" म्हणून सदा न कदा मिरवणाऱ्या मिडिया ने वरील पैकी कोणताही प्रश्न कोणालाही विचारला नाही. 

सगळेच एकमेकांना सांभाळून घेत पुढे जातायत बहुतेक. असो ! कालाय तस्मै नमः !!




1 comment: