Friday, January 1, 2010

...आठवणींच्या बागा

मज तुझी आठवण येता
सुखदायी माझ्या गावा
मन फिरुन एकदा घेते
स्मृतिचित्रांचा मागोवा

ती लाल घरे, ते माड
वळणावळणांच्या वाटा
रोजच्या रोज त्यामधुनी
आनंद येतसे भेटा!

त्या उषःकाल भूपाळया
ती संतकवींची कवने
संस्कारशिल्प घडवाया
ती पंतोजींची वचने

ते काजू-बाग, आमराया
त्यांमधली संथ दुपार
त्या दिवेलागणी वेळा
अन मनातली हुरहुर...

त्या तलम किनारयावरती
लाटांच्या अविरत ओळी
काढिती शंख-शिंपले
पुळणावरती रांगोळी

त्या निळसर डोंगररांगा
तो निळl-जांभळl पत्थर
अन पाउस पहिला पडता
ते मृद्गंधाचे अत्तर !!

ह्या शहरांमध्ये उरली
केवळ स्वप्नांपुरती जागा
स्वप्नातच फुलवायाच्या
त्या आठवणींच्या बागा,
त्या आठवणींच्या बागा...