Saturday, December 27, 2014

मायानगरी, तुला सलाम !!

(Something about this poem - those who have been to London (and to Central London, in particular) will agree that you feel an urge to visit  it again and again. Why this urge? Why this craving to visit that place? What pulls you there to that mystique experience? Is it the opulence of the place? Or the style statements of the big fashion labels? Or the magic of artworks in the Museums? Or is it just in the air? May be, all of it together....I have tried to capture it in the words below)


दिवस असो वा सांज कोवळी
अथवा रजनी काजळ काळी
सहा ऋतू अन बारा मासी
सदा झगमगे इथे दिवाळी
उल्हासाने सदा उधाणत इथले मार्ग तमाम
मायानगरी तुला सलाम !

किती मनोहर किती अप्रतिम,
सौंदर्याचे मोहक  विभ्रम
भू-लोकी वा इंद्रपुरी मी
असा कुणाही पडेल संभ्रम
वळणा-वळणावरी भेटती इथे रती-अन-काम
मायानगरी तुला सलाम !

काव्य शास्त्र अन सजीव शिल्पे
जे-जे मनुष्य स्वप्नी कल्पे
कलावंत जन इथे निर्मिती  
नाविन्याच्या शुभ-संकल्पे
सरस्वतीच्या शिरी चढविती नित्य नवीन ललाम
मायानगरी तुला सलाम !

[ललाम  = अलंकार ]

सभापटूची  वाकपटुत्वे
राजकारण्यांची कर्तृत्वे
धुरंधरांनी इथे रुजविली
लोकशाहीची तमाम तत्वे
एका ठायी नांदून गेले शांती अन संग्राम
मायानगरी तुला सलाम !

असेच येथे येत रहावे
कधी योजूनी कधी अचानक
पिउनी करावे इथला वारा
जडावलेल्या मनास हल्लक
हृदया मध्ये भरुनी निघावे इथुनी तृप्ती अनाम
मायानगरी तुला सलाम !