श्री जगन्नाथपुरी - एक नवल
वास्तविक पाहता ईश्वर हा निर्गुण आणि निराकार. पण आपले हे निर्गुण निराकार स्वरूप आपल्या भक्तांना समजायला अवघड, मग ते आपले स्वरूप जाणून कसे घेणार, आपली प्राप्ती कशी करून घेणार या कळकळीपोटी देवाने सगुण रूप धारण केले. मग भक्तांनी त्याला आपल्या भक्ती-प्रेमाने अनेक अवतारात कल्पिले, त्याच्या मूर्ती घडविल्या, मंदिरे उभारली. त्या मूर्ती शतकानुशतके जपल्या, पुजल्या, शृंगारल्या. त्या मूर्तीच्या शिवाय ते देवस्थान ही कल्पना सुद्धा आपण करू शकणार नाही इतक्या त्या मूर्ती आणि ती प्रतीके एकजीव होवून समाज-मनात रुजल्या.
म्हणूनच जेंव्हा ओरिसा मधील 'पुरी' तीर्थक्षेत्रीच्या श्री जगन्नाथ मंदिरातील मूर्ती दर काही वर्षांनी गाभाऱ्यातून काढून, विसर्जून त्या ऐवजी तिथे पूर्णपणे नवीन मूर्ती स्थापल्या जातात हे समजले तेंव्हा धक्काच बसला !
जगन्नाथपुरी हे ओरिसा मधील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. श्री जगन्नाथाचे भक्त जगभर पसरलेले. ह्या क्षेत्री आणि ह्या देवावर लोकांची अपार श्रद्धा. म्हणून जेव्हा भुवनेश्वर ला जायचा योग आला तेंव्हा तेथून जवळच असलेल्या पुरी ला जाऊन यायचं ठरवलं. स्थानिक मित्र लगेच म्हणाले की दोन महिन्यांनंतर आला असतात तर पाऊल ठेवायला ही जागा मिळाली नसती. कारण श्री जगन्नाथाचे 'नव-कलेवर' पर्व (स्थानिक उच्चार "नब-कलेबर") सुरु होत आहे. ह्या पर्वाचे महत्व अनन्य साधारण आहे आणि साधारण ३० लाख भक्त त्या छोट्याश्या 'पुरी' गावात दाखल होणार आहेत !
नव-कलेवर मधील कलेवर चा अर्थ पार्थिव शरीर, नष्ट होणारे मर्त्य शरीर. विष्णू संप्रदायामधील काही शास्त्रांचे असे मानणे आहे की शरीर जीर्ण झाल्यावर आत्मा जसा त्या शरीराचा त्याग करून दुसरे शरीर धारण करतो त्या प्रमाणे देवाच्या जुन्या, जीर्ण मूर्ती देखील बदलून नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. ज्या मूर्ती लाकडापासून बनलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत हे शास्त्र विशेष पाळले जाते. आणि पुरी क्षेत्री च्या जगन्नाथाची मूर्ती देखील अशीच लाकडापासून बनलेली आहे.
जगन्नाथपुरी मध्ये होणार्या ह्या "नब-कलेबर" उत्सवाची प्रथा आणि त्या मागची प्रक्रिया फार रंजक आहे.
हे मंदिर साधारण १२०० वर्षांपूर्वी बांधलेले. मुख्य मंदिरात मूर्ती तीन - सर्वात उजवीकडे श्री जगन्नाथ (श्री कृष्णाचा नववा अवतार), मध्ये बहिण सुभद्रा आणि डावीकडे बलभद्र (बलराम). ह्या मूर्ती धातूच्या किंवा दगडाच्या नसून लाकडाच्या बनलेल्या असतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नवीन मूर्ती स्थापन करण्यास अधिक आषाढ हा अतिशय सुयोग्य काल असतो (अधिक आषाढ म्हणजे ज्या वर्षात आषाढ महिना हा अधिक महिना येतो तो मास). असा अधिक आषाढ साधारण १२ ते १९ वर्षांनी येत असल्याने मूर्ती बदलण्याचा उत्सव साधारण १२ ते १९ वर्षांनी होतो. मागील उत्सव १९९६ साली झाला होता. म्हणजे आज ज्या मूर्ती मंदिरात आहेत त्या १९९६ साली नवीन बसवल्या गेल्या आहेत.
मूर्ती फक्त कडुनिंबाच्या झाडाच्याच बनवण्याचा दण्डक आहे. आता नवीन मूर्ती बनवायच्या म्हणजे त्यासाठी लाकडाची सोय लावणे आले ! त्यासाठी योग्य असा निंबवृक्ष शोधण्याचे काम चैत्र महिन्या पासून (म्हणजे ४ महिने आधीपासूनच) सुरु होते. काही ठराविक भक्तमंडळींना हा अधिकार असतो. अश्या लोकांचा एक चमू व्रतस्थ अवस्थेत पायी हिंडत निंबवृक्ष शोधायला सुरुवात करतो. दिवसचे दिवस आणि रात्र-रात्र रानी-वनी हिंडतो.
नक्की कुठला वृक्ष 'देव' घडवायला वापरायचा ह्याचे निकषही फार कडक आहेत. हा वृक्ष असा हवा ज्यावर कुठल्याही पक्षांची घरटी असू नयेत किंवा त्यांच्या वास्तव्याच्या खुणा असू नयेत. ह्या वृक्ष्याच्या फांद्याही ठराविक संख्येच्याच हव्यात. वृक्षावर शंख, चक्र, गदा आणि पद्म हि विष्णू ची शुभचिन्हे उमटलेली असावीत. आणि मुख्य म्हणजे वृक्ष्यापाशी एखाद्या भुजंगाचा वास असावा ! मी हे सर्व ऐकूनच चक्रावलो आणि असे वृक्ष मिळणार तरी कुठे आणि किती ह्या काळजीत पडलो ! कारण असा एक वृक्ष सापडून भागणार नाही…. श्री जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा ह्यांच्या मूर्ती साठी प्रत्येकी एक आणि शिवाय सुदर्शन चक्रासाठी चौथा असे एकंदर चार वृक्ष लागणार !
पण भक्तांची काळजी देवाला ! असे म्हणतात की वृक्षाचा शोध करत जेंव्हा भक्त मंडळी रानोवनी फिरत असतात तेंव्हा देवी स्वप्नात येउन भक्तांना दिशादर्शन करते आणि "ह्या दिशेला जाऊन शोधा म्हणजे वृक्ष सापडेल" असा दृष्टांत देते….
मी पुरी ला पोहोचल्याच्या दुसऱ्याच दिवशीच्या Times of India मधे 'सुदर्शन चक्र' बनवण्यासाठी चा पहिला वृक्ष सापडल्याची बातमी आली आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरला ! टीव्ही वरही हीच breaking news चालू होती. वृक्ष्याच्या बुंध्याशी नाग आढळल्याचाही उल्लेख बातमीमध्ये होता.
वृक्ष सापडल्यानंतर तो तोडणे ही फार विधिवत होते…. आधी त्या वृक्षापाशी यज्ञयाग होतात, प्रसादाचे वाटप होते …. त्यानंतर सोने व चांदीने बनवलेल्या कुर्हाडीने त्या वृक्षावर काही हलके आघात केले जातात (symbolic आघात) आणि मग साध्या कुऱ्हाडीने वृक्ष तोडला जातो.
जेंव्हा सुदर्शन चक्रासाठीचा वृक्ष सापडल्याची बातमी आली तेंव्हा लगेचच त्याच्या दर्शनासाठी लोकांची रीघ लागली…. पोलिसांना barricades लावून ती जागा सील करावी लागली. लोक प्रसादाची ताटे घेऊन त्या वृक्षापाशी झुंबड करायला लागले. जगन्नाथाप्रती लोकांची श्रद्धा किती तीव्र आहे त्याचा अनुभव आला.
तर असे चार वेगवेगळे वृक्ष शोधून झाले की ते कापून एका विशिष्ठ जागी आणले जातात आणि तिथे त्यांच्या मूर्ती घडवल्या जातात. मूर्ती घडवायची दंतकथा अशी की एक राजा-राणी होते. राणी ला श्री जगन्नाथाची मूर्ती करून त्याची पूजा अर्चा आणि सेवा करावी अशी इच्छा झाली. तिने एका वयोवृद्ध मूर्तीकाराला पाचारण केले. मूर्तिकाराने अशी अट घातली की मी एका सदनात दारे खिडक्या लावून माझे काम करणार, मला कोणीही disturb करायचे नाही आणि काम पूर्ण व्हायला साधारण १ महिना लागेल. राणी कबूल झाली. मूर्तीकाराने काम सुरु केले. पण ८-१० दिवसांनंतर आतमधून काहीच हालचाल ऐकू येईना तशी राणीची उत्कंठा वाढली ! राणीने दरवाजा उघडून बघायला सांगितले. पाहतात तो काय - मूर्ती अर्धवट झाल्या होत्या आणि त्या वृद्धाचे निधन झाले होते ! आता ह्या अर्धवट मूर्तींचे काय करायचे ह्या द्विधा मनस्थितीत राणी असताना श्री जगन्नाथाने दृष्टांत देवून राणीला सांगीतले कि "तू ह्या अर्धवट घडविलेल्या मूर्तींचीच स्थापना कर. मूर्तीला हात नाहीत… मी माझ्या दोन भक्तांमध्ये दावे-उजवे करणार नाही. ह्या मूर्तीला कान, नाक तोंड काही नाही… त्यामुळे मी जे घडेल आणि डोळ्यांना दिसेल त्यावरच विश्वास ठेवेन. आणि तुम्ही सर्वही जीवनात असेच वागत चला." राणी संतोष पावली आणि मूर्तींची स्थापना आणि पूजा अर्चा झाली.
जेंव्हा नव-कलेवर पर्वात जुन्या मूर्ती बदलून नवीन मूर्ती स्थापतात, तेंव्हा एक गुप्त विधी असतो. जुन्या कलेवरातील आत्मा नवीन कलेवरात घालण्याचा !! हा विधी करण्यासाठी जवळपासच्या गावातून एका वृद्ध व्यक्तीचीच निवड केली जाते…. कारण असे सांगतात की आज पर्यंत ज्या-ज्या व्यक्तीने आपल्या हाताने हे प्राण-संक्रमण केले आहे त्या व्यक्तीचे १५ दिवसातच निधन झाले आहे ! खरे-खोटे तो एक जगन्नाथच जाणे !
हे सांगणे न लगे की जगन्नाथ यात्रेचा रथ सुद्धा दर वर्षी नव्याने बनवला जातो. दर्शनाला मंदिरात जाण्याच्या वाटेवर मोठमोठ्या वृक्षांचे बरेच ओंडके रस्त्याच्या कडेला आणून ठेवलेले दिसले. ते ह्याच कामासाठी.
इतक्या कथा आणि दंतकथा ऐकल्यावर मंदिर पाहण्याची आणि दर्शन घेण्याची फार उत्सुकता लागली होती ! मंदिर खरोखर फार सुंदर आणि कलाकुसरींनी भरलेले आहे. एका मोठ्या प्रांगणात अनेक मंदिरे आहेत - गणपती, कृष्ण, शारदा, लक्ष्मी इत्यादींची. आणि एक मुख्य मंदिर आहे श्री जगन्नाथाचे. बरेच लोक मूळ मंदिराचे, गाभाऱ्यातील जगन्नाथ, सुभद्रा इ, चे दर्शन फार लांबून घेत होते. लोक जवळ जाऊ नयेत ह्या साठी एक अडसरवजा वासा आडवा लावून ठेवला होता. असे का? हा प्रश्न विचारल्यावर असे समजले की मंदिराचे बांधकाम जेंव्हा झाले तेंव्हा गाभारा आणि त्याच्या आजूबाजूला पाया रचताना १,००० शाळीग्राम (एक प्रकारचा दगड, ज्याचे हिंदू पूजा-अर्चनेमध्ये महत्व फार आहे) तळाशी रचले होते. शाळीग्राम हे सुद्धा देवाचेच एक रूप मानून त्याची नित्य पूजा करण्याचा प्रघात हिंदुस्थानात अनेक ठिकाणी अहे. त्यामुळे अशा शालीग्रामाला ओलांडून, त्याचा अपमान करून आपण देवदर्शन कसे घ्यायचे? अशी स्थानिकांची भावना असते. म्हणून जगन्नाथाचे दर्शन लांबूनच घेण्याचा सल्ला आम्हाला देण्यात आला. (हे १,००० शाळीग्राम त्या वेळच्या नेपाळ-नरेशाने दिले होते. म्हणून आज जगन्नाथाचे दर्शन घेताना इतर कोणालाही आपले मानाचे शिरस्त्राण (पगडी, फेटा इत्यादी) उतरवून मगच दर्शन घ्यावे लागते. परंतु नेपाळच्या राजाला मात्र हा नियम लागू नाही !)
मंदिराच्या आजूबाजूला दगडी फरसबंदीचे प्रांगण आहे. तिथे एका बाजूला रांगेने काही कनाती लावून त्यामधे काही अन्न शिजवण्याचे काम सुरु होते. जगन्नाथाची आरती झाल्यानंतर प्रसादाचा काही भाग ह्याच शिजवलेल्या अन्नामध्ये मिसळला जातो आणि येणाऱ्या सर्व भक्तांना हे अन्न प्रसाद म्हणून दिले जाते. हे अन्न शिजवून माफक किमतीमध्ये प्रसाद म्हणून विकणारे खरे तर खाजगी व्यावसायिक आहेत. परंतु खापराच्या मडक्यांमध्ये विस्तवावर शिजवलेला तो प्रसाद अमृतासारखा लागला ! शिवाय मनामधे श्री जगन्नाथाच्या दर्शनाची गोडी होतीच !
तर असे हे कथा, उपकथा आणि दंतकथांनी भरलेले आणि भारलेले श्री जगन्नाथपुरी चे तीर्थक्षेत्र…. कधी जायचा योग आला तर चुकवू नका :)